चायनिज सेंटर वर बिअरच्या बाटलीने हल्ला ; तरुण गंभीर जखमी
रत्नागिरी, ता. १८ ः चायनिज सेन्टरवर चायनिज आणण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यातवर व हातावर बीरची बाटली मारुन जखमी केले. उपचारासाठी तरुणाला पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता.१६) रात्री नऊच्या सुमारास राधिका चायनिज सेंटर, पाली- मराठवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रसन्न रमेश राऊत (वय ३६, रा. पाली-मराठवाडी, रत्नागिरी) यांचा भाऊ प्रशांत हा चिकन विक्री दुकानात काम करत असताना. त्याच्या दुकानाच्या समोर समर्थ बिअर शॉपी आहे. तो दुकानात असताना शॉपीमध्ये भांडणे चालल्याचे त्याला निदर्शनास आले. भांडणे मिटविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ प्रशांत हा गेला असता बिअर शॉपीचे मालक- राजेश सावंत (रा. पाली, रत्नागिरी) यांच्यात व चार अनोळखी मध्ये झालेली भांडणे मिठविली. त्यानंतर प्रशांत रात्री नऊच्या सुमारास राधिक चायनिज सेंटरवर चायनिज आणण्या करिता गेला होता. त्याच्या दुचाकीवर बसत असताना चार अनोळखी व्यक्ती त्यांच्या पाठीमागून येवून डोक्यात व हातावर बीअरची बाटली मारली व इतर तीन जणांनी प्रशांत याला शिविगाळ धकला-बुकल मारहाण करुन पलायन केले. या प्रकरणी प्रशांतचा भाऊ फिर्यादी प्रसन्न राऊत यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात अनोळखी चार जणांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.