मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर मार्गावर खाजगी लक्झरी बसवर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी: शहरातील मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर दरम्यान सोमवारी रात्री वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या खाजगी लक्झरी बसवर रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाने धडक कारवाई केली. जिल्हा पोलिस उपअधीक्षक बी. बी.माहामुनी यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून ही कारवाई केली. रत्नागिरी शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे तसेच इतर शहरांकडे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसची वाहतूक सुरू असते. रात्रीच्या वेळेत या बस मारुती मंदिर ते आरोग्य मंदिर मार्गावर प्रवासी घेण्यासाठी किंवा थांबण्यासाठी थेट रस्त्याच्या मध्यभागी उभ्या केल्या जात असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे नागरिक, दुचाकीस्वार तसेच इतर वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.स्थानिक नागरिकांकडून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री जिल्हा पोलिस उपअधीक्षक माहामुनी यांनी अचानक या परिसराची पाहणी केली. यावेळी नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर उभ्या असलेल्या खाजगी लक्झरी बस चालकांवर कारवाई करण्यात आली. काही वाहन चालकांना समज देण्यात आली, तर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली.
या कारवाईमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. तसेच भविष्यात अशा प्रकारे रस्त्याच्या मध्यभागी बस उभ्या केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला.
दरम्यान, नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केले असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या नियमित मोहिमा राबविण्याची मागणीही केली आहे