खेरशेतजवळ कार- इलेक्ट्रिक दुचाकीची धडक, दोन जण जखमी
चिपळूण:
मुंबई-गोवा महामार्गावरील खेरशेत येथील सूरज ढाब्याजवळ असलेल्या रोड डायव्हर्शनवर कार आणि इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेला युवक दोघेही जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवार, १६ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी दुचाकी चालक प्रशांत संजय सावंत (रा. तोडली, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची सविस्तर माहिती अशी:
ठाणे येथील फिर्यादी दीपक सुरेश यादव (वय २२ वर्षे, रा. दिवा दातीवली, ठाणे) हे आपली वॅगनआर कार (क्र. MH-05-FG-5021) घेऊन मुंबई-गोवा महामार्गाने कोल्हापूर-गगनबावडा येथे चालले होते. शनिवारी सकाळी ६ वाजता त्यांची कार खेरशेत येथील सूरज ढाब्याजवळ असलेल्या रोड डायव्हर्शनजवळ आली असता, आरोपी प्रशांत सावंत याने आपल्या ताब्यातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर (क्र. MH-08-BD-9264) अचानक डायव्हर्शनमधून मधोमध आणली.
कार चालकाचा ताबा सुटल्याने कारची इलेक्ट्रिक दुचाकीला जोरदार ठोकर लागली. या अपघातात दुचाकी चालक प्रशांत सावंत याच्यासह त्याच्या पाठीमागे बसलेला युवक कुणाल एकनाथ शिंदे (रा. कुशिवडे, ता. चिपळूण) हा गंभीर जखमी झाला आहे. याशिवाय दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातानंतर कार चालक दीपक यादव यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकी चालक प्रशांत सावंत याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शनिवार, १६ मे रोजी दुपारी १२:२१ वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.