डेरवण येथे झाडावरून पडून प्रौढाचा मृत्यू
चिपळूण:
आंबे काढत असताना झाडावरून अचानक खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने एका ५२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, १६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास डेरवण येथे घडली.
रमेश पांडुरंग जाधव (वय ५२ वर्षे, रा. डेरवण सहाण बौद्धवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास रमेश जाधव हे आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढले होते. मात्र, झाडावरून उतरत असताना किंवा काढत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सायंकाळी ६:५३ वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी मयताच्या मुलाने दिलेल्या खबरीवरून चिपळूण पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस रात्री ११ वाजल्यापासून या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे डेरवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.