खेड तालुक्यात १४१६ ग्रामस्थांच्या घशाला कोरड !
११ गावातील २१ वाड्यांना टँकरचा आधार
खेड : तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता हळूहळू वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात घट होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तालुक्यातील ११ गावातील २१ वांड्यांमध्ये १४१६ ग्रामस्थांच्या घशाला सद्यस्थितीत कोरड पडली आहे. दिवसागणिक टंचाईग्रस्त गाववाड्यांची संख्या वाढत असताना येथील पं. स. च्यां पाणी विभागाकडे अजूनही एकच टँकर उपलब्ध आहे. एका टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे.
तालुक्यात उन्हाने कहर केला असून ग्रामस्थ अक्षरशः हवालदिल झाले आहे. त्यातच वाढत्या उष्म्यामुळे नद्या, नाले, विहिरी कोरड्या पडून ग्रामस्थांची दाहिदिशा सुरू आहे. यामुळे एकामागोमाग एक टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल होत आहेत. तहानलेल्या गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची पुरेपूर व्यवस्था येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागानें ठेवली असली तरी तहानलेल्या गाव-वाड्यांची मदार एकाच टँकरवर अवलंबून आहे. टंचाईग्रस्त गाव-वाड्यांमध्ये धनगरवाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे या गाव-वाड्यांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचना पंचायत समिती सभापती डॉ. आफिया पालेकर, उपसभापती सुनिल मोरे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांनी दिल्या आहेत. पाणीटंचाईवर प्रशासनाकडून विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.