धामणीजवळ लक्झरी बस-रिक्षा भीषण अपघात
दोघे गंभीर जखमी, २३ प्रवासी बचावले
संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका कायम असतानाच मंगळवारी उशिरा रात्री धामणी रेल्वे स्थानकाजवळ खासगी लक्झरी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून बसमधील २३ प्रवासी थोडक्यात बचावले. बस रस्त्यालगतच्या दरडीवर जाऊन आदळल्याने मोठी जीवितहानी टळली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास रिक्षा (एमएच ०८ बीसी २०३५) धामणी रेल्वे स्थानकाकडून संगमेश्वरच्या दिशेने येत होती. त्याचवेळी विजयदुर्गहून मुंबईकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्सची बस (एमएच ०१ ईएल ५४९५) २३ प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होती. समोरून येणाऱ्या रिक्षेला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचा ताबा सुटला आणि बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला उतरून थेट दरडीवर आदळून थांबली.
सुदैवाने बस खोल दरीत कोसळली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. अपघाताचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात घुमल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसचा मुख्य दरवाजा उघडता न आल्याने स्थानिकांनी प्रसंगावधान राखत आपत्कालीन दरवाजातून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
या अपघातात रिक्षाचालक अभिजित संजय गमरे आणि प्रवासी कुणाल सुरेंद्र कांबळे हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी रक्ताचे सडे पडले होते. जखमींना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
दरम्यान, अपघातानंतर महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांवरून प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्रीच्या वेळी स्पष्ट दिशादर्शक फलक आणि डायव्हर्जन बोर्ड नसल्याने चालकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप करण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.