सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा; देवरुखात ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा
देवरुख:-
सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार, ११ मे २०२६ रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास मार्लेश्वर पेट्रोल पंपासमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल शांताराम कदम (वय ४२, रा. कोंडगे, लांजा) याने त्याच्या ताब्यातील अशोक लेलंड कंपनीची ट्रॅव्हल्स (क्र. MH 04 KF 9960) मुख्य डांबरी रस्त्यावर उभी केली होती. सदर वाहन अशा स्थितीत होते की ज्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना आणि इतर वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत होता. विशेष म्हणजे, या ट्रॅव्हल्सच्या पुढील बाजूस प्रखर लाईट आणि चारही बाजूंना लाल-निळसर रंगाचे छोटे दिवे लावून ते रस्त्यावर उभे करण्यात आले होते.
या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत शामराव साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम २३५/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.