रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या ‘बाल वाचन कट्टा’ उपक्रमाला बालदोस्तांचा उत्सफूर्त प्रतिसाद
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने मुलांसाठी सुरू केलेल्या ‘बालवाचन कट्टा’ या अभिनव योजनेला पहिल्या दिवसापासूनच मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. १० मे २०२६ पासून सुरू झालेला हा उपक्रम १० जून २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, रत्नागिरीतील बालवर्गासाठी हा उपक्रम ज्ञानाची पर्वणी ठरत आहे.
आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि टीव्हीमध्ये व्यस्त असताना, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने वाचनालयाने या खास ‘बालवाचन कट्ट्या’चे आयोजन केले आहे. या योजनेअंतर्गत मुलांसाठी भरपूर वाचनसाहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये ज्यामध्ये हॅरी पॉटर, फास्टर फेणे, फेमस फाईव्ह समावेश आहे. त्याच बरोबरच लहान गोष्टींच्या स्वरुपातील थोर व्यक्तित्व, समाजसुधारक यांचा परिचय करुन देणारी पुस्तके, चातुर्यकथा, युध्द कथा, साहसकथा तसेच 1695 स्मार्ट रोबो-ए आय आणि औरंगजेब यासारखी विज्ञानाची, AI बाबतची जिज्ञासा वाढवणारी पुस्तके यांचा समावेश आहे.
पालकांकडूनही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यमामुळे अनेक पालक या उपक्रमाची माहिती घेऊन आपल्या पाल्याला ग्रंथालयाच्या सावलीत मुक्त वाचनासाठी प्राधान्य देत आहेत. हा उपक्रम १० जूनपर्यंत विनामूल्य सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त मुलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
