ऑनलाईन क्लासच्या नावाखाली महिलेची फसवणूक; ५३ हजारांचा गंडा
रत्नागिरी:
ऑनलाईन शिक्षणाचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचे सत्र सुरूच असून, रत्नागिरीतील एका महिलेची ‘प्लॅनेट स्पार्क’ (Planet Spark) क्लासेसच्या नावाने ५३ हजार ५६३ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील जेलरोड परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिला, अॅड. प्रगती प्रमोद पाटील (वय ३८) यांनी जानेवारी २०२६ मध्ये युट्यूबवर ‘प्लॅनेट स्पार्क क्लासेस’ची एक जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीच्या माध्यमातून त्यांची ओळख विकास जाडान नावाच्या व्यक्तीशी झाली.
संबंधित व्यक्तीने प्रगती पाटील यांना दोन वर्षांच्या एका कोर्सची माहिती दिली. या माहितीवर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या क्रेडिट कार्डद्वारे फी स्वरूपात एकूण ५३,५६३.४६/- रुपये ऑनलाईन भरले. मात्र, पैसे भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रगती पाटील यांनी तातडीने ऑनलाईन सायबर तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या चौकशीअंती शुक्रवारी (८ मे २०२६) दुपारी रत्नागिरी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी विकास जाडान नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या कलमान्वये कारवाई
रत्नागिरी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १४६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.