गोळप येथे किरकोळ कारणातून प्रौढावर सुरीने वार
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील गोळप येथे किरकोळ कारणातून प्रौढावर सुरीने वार केल्याची घटना गुरुवार 7 मे रोजी रात्री 9.15 वा.सुमारास घडली.
शैबाज युसूफ मजगावकर (49,रा.गोळप मोहल्ला,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात शौकत मजिद सारंग (55,रा.गोळप मोहल्ला,रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी रात्री संशयिताने फिर्यादी शौकत सारंग यांना तुम्ही लग्नाला जाता की दारु प्यायला जाता असे बोलला. तेव्हा त्यांनी संशयिताला तू मला असे का बोललास असे विचारले त्यावर संशयित शैबाजने त्यांना शिवीगाळ करुन धकलाबुकल केली. त्यानंतर फिर्यादी हे घरी निघून गेले असता शैबाजने त्यांच्या घराजवळ जाउन मशिदीजवळ ये असे सांगितले.
काही वेळाने फिर्यादी हे गोळप मशिदीजवळ गेले तेव्हा संशयित शैबाजने त्यांना पुन्हा शिवीगाळ करत आपल्याकडील सुरीने फिर्यादीच्या डोक्यावर डाव्या बाजुला वार करुन दुखापत केली. याप्रकरणी संशयिताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1),115(2),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.