सैतवडेच्या उझैर चिलवान यांचे सुवर्णयश: पीएच.डी. पदवीसह ‘नॅशनल स्पीच थेरपिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी: जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही जागतिक स्तरावरील यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतात, याचा प्रत्यय सैतवडे गावच्या सुपुत्राने दिला आहे. सैतवडे, गुंबद मोहल्ला येथील रहिवासी उझैर आदिल चिलवान यांनी “स्पीच थेरपी आणि स्वॅलॉइंग डिफिकल्टीज” (भाषण उपचार आणि गिळण्यातील अडचणी) या कठीण विषयात आपली पीएच.डी. पदवी यशस्वीरित्या संपादन केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशासोबतच त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत त्यांना दिल्ली येथे ‘नॅशनल स्पीच थेरपिस्ट ऑफ द इयर’ या अत्यंत मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
डॉ. उझैर चिलवान यांनी आपल्या संशोधनातून आणि वैद्यकीय सेवेतून समाजातील अशा रुग्णांसाठी काम केले आहे, ज्यांचे जीवन संवाद आणि साध्या आहारग्रहणासाठी इतरांवर अवलंबून असते. विशेषतः मेंदूघाताचा (Stroke) झटका येऊन गेलेल्या रुग्णांची बोलण्याची क्षमता परत मिळवून देणे, लहान मुलांमधील बोलण्यातील दोष किंवा भाषेचा उशिरा होणारा विकास यावर त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.
केवळ बोलणेच नव्हे, तर घशाच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर अन्न किंवा पाणी गिळण्यास त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी त्यांनी प्रभावी उपचार पद्धती विकसित केल्या आहेत. बोलता न येणाऱ्या रुग्णांना पुन्हा संवादाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद ठरले आहे. त्यांच्या या शास्त्रोक्त उपचार पद्धतीमुळे अनेक रुग्णांना एक प्रकारे नवजीवन मिळाले आहे.
दिल्लीत झाला सन्मानाचा वर्षाव
त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. नुकताच नवी दिल्ली येथे एका दिमाखदार सोहळ्यात त्यांना ‘नॅशनल स्पीच थेरपिस्ट ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे केवळ सैतवडे गावाचेच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पटलावर चमकले आहे.
वडिलांचे मार्गदर्शन आणि गावाचा अभिमान
उझैर यांचे वडील डॉ. आदिल महमूद चिलवान यांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि भक्कम पाठिंबा यांच्या जोरावरच हे यश साध्य करता आल्याची भावना उझैर यांनी व्यक्त केली आहे. एका डॉक्टर वडिलांचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेत असताना उझैर यांनी मिळवलेल्या या पदवीमुळे गुंबद मोहल्ला आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल सैतवडे ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यात त्यांच्या हातून अशाच प्रकारे रुग्णसेवा आणि संशोधन घडो, अशा शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.

