रत्नागिरीला धुळीच्या वादळासह अवकाळी पावसाचा तडाखा; वीज खांब कोसळले, आंबा बागायतदार संकटात
रत्नागिरी | प्रतिनिधी
दिवसभर कडक उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना सायंकाळी निसर्गाच्या रौद्र रूपाचा सामना करावा लागला. शनिवारी सायंकाळी अचानक सुटलेल्या भीषण धुळीच्या वादळाने शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले, त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक ठिकाणी वीज खांब कोसळल्याने ‘बत्ती गुल’ झाली असून, शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरीत उन्हाचा कडाका जाणवत होता. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि ढगाळ हवामान तयार झाले. पाहता पाहता सोसाट्याचा वारा सुटून धुळीचे वादळ घोंगावू लागले. या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यांत धूळ गेल्याने त्यांचे डोळे लालबुंद झाले. शहरात अनेक घरांवरील पत्रे उडाले, तर दुकानांच्या नामफलकांचे (पाट्या) नुकसान झाले. शनिवारी आठवडी बाजार असल्याने शहरात मोठी गर्दी होती, मात्र या वादळामुळे विक्रेते आणि खरेदीदारांची एकच पळापळ झाली.
वादळी वाऱ्याचा जोर वाढताच खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र, वादळाचा तडाखा इतका तीव्र होता की अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर संगमेश्वर तालुक्यातील आंबवली धनगरवाडी येथे विजेचा खांब जमीनदोस्त झाला. यामुळे ग्रामीण भागासह शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असले तरी, अंधारामुळे दुरुस्ती कामात अडथळे येत आहेत.
रत्नागिरीचा हापूस हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. मात्र, या वादळी पावसाने उरल्यासुरल्या पिकावरही पाणी फेरले आहे. झाडावर असलेला तयार आंबा वादळामुळे मोठ्या प्रमाणावर गळून पडला आहे. बागायतदारांनी वर्षभर मेहनत करून जोपासलेला आंबा आता शेवटच्या क्षणी मातीमोल झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
काही काळ आलेल्या या वादळाने रत्नागिरीकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. धुळीच्या लोटांमुळे समोरचे काहीही दिसत नसल्याने वाहनचालकांनाही रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या कराव्या लागल्या. अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या वादळाने केलेल्या नुकसानीची तीव्रता मोठी आहे.

