भोस्ते घाटात वाहनांचा तिहेरी अपघात
पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीलाही फटका
खेड:
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास एका निष्काळजी कार चालकामुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात खेडच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनालाही पाठीमागून धडक बसली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आरोपी चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी रात्री १० वाजता खेड उपविभागीय पोलीस कार्यालयाचे चालक पोलीस शिपाई लतिकेश सखाराम मोरे हे सरकारी वाहन (क्रमांक MH 08 BE 3391) घेऊन चिपळूणहून खेडच्या दिशेने येत होते. या वाहनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शैलेश सणस हे देखील होते. भोस्ते घाट उतरत असताना हा अपघात घडला.
याच लेनवरून प्रवास करणारा कार चालक प्रविण लक्ष्मण मालप (रा. रायपाटण, राजापूर) याने आपल्या ताब्यातील वाहन (क्रमांक MH 43 BP 8097) हयगयीने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवले. त्याने प्रथम त्याच्या पुढे असलेल्या अर्टिगा कारला (क्रमांक MH 07 AS 2027) जोराची धडक दिली. या धडकेच्या प्रभावामुळे अर्टिगा कार समोर असलेल्या पोलिसांच्या सरकारी वाहनावर जाऊन आदळली.
या साखळी धडकेत पोलिसांच्या वाहनासह अर्टिगा कारचेही नुकसान झाले आहे. धडक देणारा चालक प्रविण मालप हा स्वतः या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे.
पोलीस शिपाई लतिकेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात आरोपी चालक प्रविण मालप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ मे रोजी पहाटे २:२२ वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.