बुरंबी येथे माडावर वीज कोसळून आग
संगमेश्वर:
तालुक्यातील बुरंबी परिसरात गुरुवारी सायंकाळी निसर्गाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले. अचानक आलेल्या वादळी पावसात भरत दळवी यांच्या नारळाच्या झाडावर भीषण वीज कोसळून झाडाने पेट घेतला. आग आणि धुराचे लोट पाहून परिसरात एकच घबराट पसरली.
धक्कादायक बाब म्हणजे, वीज कोसळली त्यावेळी सौ. भावना दळवी या झाडाखाली काम करत होत्या. मात्र, जोरदार कडकडाट ऐकताच त्यांनी प्रसंगावधान राखून काही क्षण आधीच तेथून धाव घेतली आणि अवघ्या काही सेकंदात झाडावर वीज आदळली. क्षणभराचा विलंब झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती.
वीज कोसळल्यानंतर झाडाने भीषण पेट घेतला होता. सुदैवाने त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे आग आटोक्यात आली. या घटनेत झाडाचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी टळल्याने दळवी कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला.