आगीत गोठा खाक; दोन लाखांचे नुकसान
असुर्डे येथील घटना : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बैलांना वाचविण्यात यश
संगमेश्वर:
तालुक्यातील असुर्डे मनवेवाडी येथे गोठ्याला लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे गोठ्यातील दोन बैलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून मोठी जीवितहानी टळली आहे.
असुर्डे मनवेवाडी येथील चंद्रकांत भागोजी मनवे यांच्या घराच्या शेजारीच त्यांचा गोठा आहे. सोमवारी संध्याकाळी साडेचार – वाजण्याच्या सुमारास या गोठ्याला ना अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून जवळच काम करत हा असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने गोठ्याकडे धाव घेतली आणि आरडाओरडा करून मदतीसाठी इतरांना बोलावले.
आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घरातील पाणी आणि जवळच असलेल्या बोअरवेलच्या साहाय्याने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. गोठ्यात दोन बैल बांधलेले होते, त्यांना ग्रामस्थांनी आगीच्या विळख्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत गोठ्यातील साहित्य आणि बांधकामाचे मिळून अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
घटनेची माहिती मिळताच असुर्डेचे सरपंच प्रदीप शिंदे, तलाठी अमर फटतरे, ग्रामसेवक कांबळे, कोतवाल संदेश शिंदे आणि वरिष्ठ लिपिक अजय यांनी घटनास्थळी भेट दिली. महसूल विभागातर्फे नुकसानीचा रितसर पंचनामा करण्यात आला आहे.
संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. बैलांना वाचवण्यात यश आले आहे.