जिल्हा मध्यवर्ती बँकेचे भागभांडवल मर्यादा ७५ कोटींवरून थेट १२५ कोटींवर
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत बँकेच्या संचालकांच्या जागांमध्ये वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. हा प्रस्ताव सहकार खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे संचालकांच्या जागा २१ वरून २५ होणार आहेत. सोमवारी झालेल्या सभेत पोटनियमांच्या दुरुस्तीत बँकेचे भागभांडवल ७५ कोटीवरुन १२५ कोटी करण्यास संमती देण्यात आली.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष साधारण सभा मराठा मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या पटलावर ठेवलेले विषय अवघ्या पंधरा मिनिटात सभासदांनी मंजूर केले. शासनाच्या सहकार खात्याच्या नवीन धोरणानुसार, बँकेच्या पोटनियमांमध्ये दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या आहेत. यानुसार भागभांडवल ७५ कोटीवरून १२५ कोटी करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. याला सभासदांनी मंजुरी दिली. दुसरा बदल म्हणजे भविष्यात होणाऱ्या बँकेच्या निवडणुकांमध्ये संचालकांच्या मतदार संघात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सद्यःस्थितीत २१ संचालक असून, ही संख्या आता २५ करण्याबाबत पोटनियमात दुरुस्ती करण्यात आली. काही मतदार संघ दोन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सध्या कृषीपणन, शेतमाल प्रक्रिया संस्था व व्यक्ती असा जिल्हाकरिता एक मतदार संघ होता तो आता कृषीपणन, शेतमाल प्रक्रिया संस्था असा एक आणि सर्वसाधारण व व्यक्ती असा दुसरा मतदार संघ जिल्ह्यासाठी केला जाणार आहे. गृहनिर्माण, गृहतारण सहकारी संस्था व पगारदार नोकरांच्या संस्था असा जिल्ह्यासाठी एक मतदार संघ होता. यात बदल करून गृहनिर्माण व गृहतारण सहकारी संस्थांसाठी एक आणि पगारदार नोकरांच्या संस्थांसाठी एक असे संपूर्ण जिल्ह्यासाठी दोन मतदार संघ वेगळे केले जाणार आहेत. मजूर संस्था, स्वयंरोजगार, बेरोजगार व हमाल कामगार सहकारी संस्था असा जिल्ह्यासाठी एक मतदार संघ होता. त्यात बदल करून मंजूर संस्थांसाठी एक आणि स्वयंरोजगार, बेरोजगार व हमाल कामगार संस्थांसाठी एक असे जिल्ह्याकरिता मतदार संघाची मागणी केली जात आहे. औद्योगिक वाहतूक व्यवसाय, देखरेख उत्पादक सहकारी संस्था व मच्छीमार सहकारी संस्था व अन्य सहकारी संस्था यांचा जिल्ह्यासाठी एक मतदार संघ होता. यात बदल करून औद्योगिक वाहतूक व्यवसाय, देखरेख उत्पादक सहकारी संस्थांसाठी एक आणि मच्छीमार सहकारी संस्था व अन्य सहकारी संस्थांसाठी एक संपूर्ण जिल्ह्यासाठी एक मतदार संघ असणार आहे.