गणपतीपुळेत ‘एकता असोसिएशन’तर्फे मोफत ब्रेकडाऊन सेवा
रत्नागिरी:
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने ‘एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशन’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत ब्रेकडाऊन सर्व्हिस कॅम्पचे यशस्वी आयोजन करण्यात आले. २००६ पासून अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमाने यंदाही भाविकांची मने जिंकली.
गणपतीपुळे यात्रेनिमित्त हजारो भक्त दुचाकीवरून दर्शनासाठी येतात. प्रवासादरम्यान गाडी बंद पडणे, टायर पंक्चर होणे किंवा इतर तांत्रिक बिघाड झाल्यास भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी आणि मेकॅनिक बांधव रस्त्यावर उतरून मोफत सेवा देतात. “सेवा हाच आमचा धर्म” या भावनेतून सर्व मेकॅनिक या कॅम्पमध्ये आपले योगदान देतात.
या सेवाभावी उपक्रमाला रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी असोसिएशनच्या वतीने त्यांना फुलझाड देऊन सन्मानित करण्यात आले. कॅम्पचे रीतसर उद्घाटन असोसिएशनचे ज्येष्ठ पदाधिकारी व महाराष्ट्र राज्य मेकॅनिक फेडरेशनचे रत्नागिरी संपर्क प्रमुख गणेश नारायण शेंडे यांच्या हस्ते पार पडले. तसेच ‘वॉल्वलाईन ऑईल’चे सेल्स एक्झिक्युटिव्ह सुनील जाधव यांनीही या उपक्रमाला भेट देऊन कौतुक केले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत
हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव व तालुका अध्यक्ष धनंजय कदम, राज्य फेडरेशन संपर्क प्रमुख दिलीप शिंदे, पावस विभाग अध्यक्ष महेश पालकर, मयुरेश यादव, समीर शेट्ये, प्रमोद (बावा) शिवलकर, जितेंद्र भूते, दिनेश धनावडे, श्रीकांत गौंड, उमेश कुलकर्णी, नेवरेकर मेस्त्री, प्रथमेश कांबळी आणि इतर सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

या सामाजिक उपक्रमाला डिलाईट इंडस्ट्री प्रा. लि. चे डायरेक्टर श्री. राजीव देवळे, वुर्थ ऑईल कंपनीचे श्री. दीपक करंडे आणि प्रणव ऑईल डिस्ट्रीब्युटर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.