सत्कोंडी जि.प. शाळेचा वार्षिक महोत्सव उत्साहात संपन्न
रत्नागिरी: तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा सत्कोंडी या शाळेचा सन २०२५-२६ चा वार्षिक महोत्सव बुधवार दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी कै. अनंतराव बैकर बहुउद्देशीय संकुल सत्कोंडी येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचप्रमुख तथा माजी विद्यार्थी संघ समितीचे अध्यक्ष भाऊ काताळे हे होते. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत सत्कोडीचे विद्यमान सरपंच सतीश थुळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडेचे अध्यक्ष सज्जाद अ.करीम सय्यद व कार्यकारणी सदस्य मुजफ्फर सय्यद,न्यू इंग्लिश स्कूल सैतवडेच्या मुख्याध्यापिका सिद्धी लांजेकर, संदखोल केंद्राचे केंद्रप्रमुख अरविंद महाकाळ, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनाचे अध्यक्ष संजय बैकर, ॲक्टिव्ह फ्रेंड्न्स सर्कलचे उपाध्यक्ष नितीन बैकर,ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच चंद्रकांत मालप, सदस्य अजय काताळे, ममता बंडबे, समीक्षा घाटे,निकीता शिगवण,पोलीस पाटील श्रीकांत खापले, मुख्याध्यापक नामदेव नागरगोजे , तिरंगा महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा विजया डिंगणकर, क्रीडा शिक्षक नितीन जाधव व परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक व सहशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार जर कमी पटाच्या शाळा अन्य शाळांच्या मध्ये समाविष्ट करण्याचं निर्णय झाला तर त्यादृष्टीने सत्कोंडी शाळा परिसराला एक पर्याय निर्माण व्हावी यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, सत्कोंडी परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य, गावप्रमुख व पालक वर्ग त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पदाधिकारी हे विशेष प्रयत्न करीत आहे.
यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण मोर्ये म्हणाले की, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बालभवन, विज्ञानभवन ही संकल्पना राबवून प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग हाताळत आनंददायी शिक्षण घेण्याच्या दृष्टीने विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे येत्या शैक्षणिक वर्षात शाळेत सेमी इंग्लिश माध्यम सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे.
यावेळी यंदा शाळाबाह्य परीक्षेमध्ये राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या शाळेच्या इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या अर्णव नितीन जाधव या विद्यार्थ्यांचा व शाळेच्या उत्तम कामगिरीसाठी मुख्याध्यापक नामदेव नागरगोजे, कामगिरी शिक्षिका सुनिता मुंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक सादर करताना ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर यांनी शाळेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, त्याचप्रमाणे शाळा उत्कर्ष निधी निर्माण व्हावा यासाठी स्वतःपासून सुरुवात करत आपल्या मातोश्री स्नेहलता अनंत बैकर यांच्या नावे एक लाख रुपयांची देणगी दिली. त्याच्याच पावलावर पाऊल टाकतात अनेक मान्यवरांनी हजारो रुपयांचा शाळा उत्कर्ष निधी यावेळी जमा केला व शाळेचे विविध उपक्रम राबवण्यासाठी हातभार लावला. यावेळी बोलताना सरपंच सतीश थुळ यांनी शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करतानाच राज्यातील एकमेव सौरऊर्जेवरती चालणारी शाळा व शाळेचा परिसर, शाळेला शुद्ध पाण्याचे वॉटर एटीएम व ग्रामपंचायतच्या माध्यमातून शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. तसेच शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडेचे अध्यक्ष सय्यद यांनी आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या शाळा व सत्कोंडी परिवाराचे तोंडभरून कौतुक केले.
विविध प्रकारच्या शैक्षणिक चर्चा संपन्न झाल्यानंतर शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांचा व ग्रामस्थांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राची लोकधारा व लोकप्रिय गीतांवर नृत्याविष्कार सादर करण्यात आला. यामध्ये शाळेच्या माजी विद्यार्थी असलेल्या व सध्याच्या पालक असलेल्या महिलांनी समईनृत्य सादर करून उपस्थित त्यांची मने जिंकली, त्याचप्रमाणे शाळेची माजी विद्यार्थिनी असलेल्या भार्गवी सतीश थुळ हिने हिरकणीच्या आयुष्यावरती दर्जेदार एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थिततांना भावनिक बनविले.
उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने उपस्थित रसिकांनी मनमुराद आनंद लुटला व उत्तररात्री या वार्षिक महोत्सवाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, पालक, आजीमाजी विद्यार्थी, सत्कोंडी परिवारातील सदस्य व ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.