मुरुगवाडा येथे गावठी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा
रत्नागिरी ः शहरातील मुरुगवाडा येथे गावठी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३ हजार २२० रुपयांची ३० लिटर दारु जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अब्दूल अलीसहा मुजावर (वय ४०, रा. मुरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुरुगवाडा गद्रे कंपनी झोपडपट्टी येथे एका माडाच्या झाडाशेजारी निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित अब्दूल मुजावर हा विनापरवाना हातभट्टीची ३० लिटर दारु विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेड कॉन्स्टेबल योगेश शेट्ये यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.