सख्ख्या भावाला मारहाण, सत्र न्यायालाकडून शिक्षा कायम
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथील प्रकार
रत्नागिरी :
देवरुख तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे सख्ख्या भावाला मारहाण केल्याप्रकरणी देवरुख न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेली शिक्षा रत्नागिरी सत्र न्यायालयाकडून कायम करण्यात आली आह़े सहा महिने सश्रम कारवास व 5 हजार रुपये दंड असे शिक्षेचे स्वरुप आह़े सखाराम नारायण रहाटे (62, ऱा आंबेड बुद्रुक त़ा संगमेश्वर) असे आरोपीचे नाव असून देवरुख न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेविरुद्ध त्याने सत्र न्यायालयापुढे अपील दाखल केले होत़े
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा सरकारपक्षाकडून अॅड़ अनुपमा ठाकूर यांनी युक्तीवाद केल़ा खटल्यातील माहितीनुसार आरोपी सखाराम नारायण रहाटे व त्यांचे मोठे बंधु अनंत नारायण रहाटे (71, ऱा आंबेड बुद्रुक त़ा संगमेश्वर) यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणातून वाद होत अस़े 10 मार्च 2017 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास अनंत रहाटे हे सोनगिरी बसस्टॉप येथे किरणा सामान आणण्यासाठी गेले होत़े त्याठिकाणाहून सामान घेवून घरी चालत जात होत़े यावेळी आरोपी सखाराम याने पाठीमागून येवून अनंत रहाटे यांच्या पाठीत दांडका मारुन त्यांना खाली पाडले व लाथा बुक्क्यांनी व हाताच्या ठोशांनी अनंत यांना मारहाण केल़ी तसेच शिवीगाळ करुन मला जेलमध्ये जाण्याची सवय आह़े दोन मर्डर मला करायचे आहेत़, त्यामध्ये पहिला तुला संपवतो अशी धमकी दिल़ी
याप्रकरणी अनंत यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलिसांनी सखाराम याच्याविरुद्ध भादंवि कलम 326, 325, व 506 नुसार गुन्हा दाखल केल़ा तसेच गुह्याचा तपास करुन देवरुख न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल़े 16 फेब्रुवारी 2023 रोजी तात्कालीन देवरुख प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ब़ द़ तारे यांनी खटल्याचा निकाल देत आरोपी सखाराम याला भादंवि कलम 325 व 506 मध्ये दोषी असल्याचा निकाल देत 6 महिने सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल़ी देवरुख न्यायालयाकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरुद्ध आरोपी सखाराम याने सत्र न्यायालयापुढे अपील दाखल केले होत़े 28 एप्रिल रोजी रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी सखाराम याचे अपील फेटाळून लावत देवरुख न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम केल़ी