बुरंबीतून इको गाडीची ‘फिल्मी स्टाईल’ चोरी
शाहूवाडीत सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून चोरटे फरार
संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी येथून दोन दिवसांपूर्वी एका इको गाडीची झालेली चोरी आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात त्याच गाडीच्या साहाय्याने टाकलेला दरोडा, एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा थरारक पद्धतीने घडल्याचे समोर आले आहे. संगमेश्वर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गाडीचा छडा लावला असला, तरी फिल्मी स्टाईलने गुन्हे करणारी ही टोळी अद्याप पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरली आहे.
बुरंबी येथील मारुती नागेश सुतार यांची ‘मारुती सुझुकी इको’ (MH-08-Z-4703) ही गाडी घराबाहेर उभी होती. अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या शांततेचा फायदा घेत, कोणालाही सुगावा लागू न देता ही गाडी अत्यंत कौशल्याने लंपास केली. गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच परिसरात खळबळ माजली. संगमेश्वर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरट्यांनी महामार्गावरून निसटण्यासाठी अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्ध हालचाली केल्याचे दिसून आले.
तपासादरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. चोरट्यांनी केवळ गाडी चोरण्यासाठी ही चोरी केली नव्हती, तर त्यांचा हेतू मोठा होता. ही चोरलेली गाडी घेऊन चोरट्यांनी थेट चिपळूण मार्गे कराड आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमा गाठली.कोल्हापूर जिल्हातील शाहूवाडी तालुक्यातील एका सोन्याच्या दुकानावर या टोळीने याच गाडीचा वापर करून फिल्मी स्टाईलने दरोडा टाकला. दरोड्यानंतर पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी मुख्य रस्ते सोडून अंतर्गत मार्गांचा वापर केला आणि केरले गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला गाडी बेवारस सोडून दिली.
संगमेश्वर पोलिसांचे पथक सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढत असतानाच, त्यांना ही गाडी शाहूवाडीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संगमेश्वर पोलिसांनी तात्काळ शाहूवाडी गाठले असता, तिथे सोन्याच्या दुकानावरील दरोड्याचा तपास करणाऱ्या स्थानिक पोलिसांना तीच इको गाडी मिळून आली होती. गाडीची पडताळणी केली असता ती बुरंबीतून चोरी झालेली सुतार यांचीच असल्याचे निष्पन्न झाले.
गाडी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी या चोरी करणाऱ्या टोळीने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. चोरीपासून दरोड्यापर्यंतचे त्यांचे नियोजन पाहता, ही एक सराईत टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या ही गाडी शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात असून, तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ती मूळ मालकाला दिली जाईल. फरार चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी संगमेश्वर आणि शाहूवाडी पोलिसांसमोर आवाहन आहे.