एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात
रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. सतीश नारखेडे, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे केंद्रप्रमुख पी. पी. कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, निर्माण कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपकेंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कुलकर्णी यांनी सध्या शिक्षणात नवीन नवीन संधी उपलब्ध असल्याचे सांगून एआय तंत्रज्ञान, राष्ट्रीय शिक्षण धोरण यावर प्रकाश टाकला. शिक्षण कुठलेही घ्या पण त्याचा उपयोग चारित्र्य घडवण्यासाठी करा कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मोठे माध्यम असल्याचे नमूद केले. सध्याची पिढी मोबाईलच्या दुष्टचक्रात अडकली असल्याचे सांगतानाच त्यांनी मोबाईल नक्कीच आवश्यक आहे पण त्याचा वापर कसा करायचा हे ठरवले पाहिजे असे सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नारखेडे यांनी पदवीदान समारंभ हा जीवनातील महत्त्वाचा टप्पा असून, महाविद्यालयातील ही तीन ते चार वर्ष आयुष्याला दिशा देणारी असल्याचे सांगितले. पदवी मिळाली म्हणजे सगळ्यांनाच नोकरी मिळणार नाही अशावेळी कौशल्याधारित शिक्षण घेऊन आपल्यातली कौशल्य विकसित करून उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षात जीवनाचे उद्दिष्ट ठरवले पाहिजे असे सांगताना त्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून बघितला तर ती नक्कीच फायदेशीर असल्याचे सांगितले. आयुष्यात काही तत्व ठेवून काम केले पाहिजे एक संधी गेली म्हणजे दुसरी कुठली तरी चांगली संधी मिळणार आहे असा सकारात्मक विचार करावा आणि मिळालेल्या संधीचे सोने करावे असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संस्थेचे चेअरमन श्री. हेगशेट्ये यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. गवाळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी कांबळे यांनी केले. एनएसएस विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी यांनी आभार मानले.