रत्नागिरीच्या धनजीनाक्यात बैलांचा थरार: भररस्त्यात राडा
दुकानाची मोडतोड आणि नागरिकांची पळापळ
रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या गजबजलेल्या धनजीनाका परिसरात सोमवारी दुपारी भररस्त्यात ‘दोन बैलांच्या जोडी’ने असा काही राडा घातला की, उपस्थित नागरिकांची अक्षरशः पळापळ झाली. या दोन्ही बैलांनी एकमेकांशी भिडताना थेट एका दुकानाचा ताबा मिळवल्याने दुकानदारासह वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले असून, शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे धनजीनाका परिसरात वर्दळ होती. अचानक दोन बैल एकमेकांसमोर उभे ठाकले आणि त्यांच्यात धुमश्चक्री सुरू झाली. सुरुवातीला ही झुंज किरकोळ वाटली, मात्र काही वेळातच या बैलांनी रौद्ररूप धारण केले. नागरिक आणि दुकानदारांनी बैलांवर पाण्याचे हबके मारून त्यांना पांगवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण ‘आरे’ला ‘कारे’ म्हणत या दोन्ही धोंड्यांनी कोणाचेही न जुमानता आपली ताकद आजमावणे सुरूच ठेवले.
ही झुंज इतकी टोकाला गेली की, एक बैल झुंजता झुंजता थेट शेजारील एका दुकानात घुसला. दुकानातील काचा, फर्निचर आणि सामानाची या बैलाने अक्षरशः दाणादाण उडवून दिली. या गोंधळात बाहेर उभी असलेली एक दुचाकीही बैलांच्या पायाखाली सापडली. बैलांनी ही दुचाकी काही अंतर फरफटत नेल्याने तिचेही प्रचंड नुकसान झाले. ऐन गर्दीच्या वेळी हा ‘लाईव्ह’ राडा पाहून परिसरातील पादचारी आणि वाहनधारकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बऱ्याच वेळानंतर ही झुंज थांबली आणि दोन्ही बैल निघून गेले, मात्र मागे राहिला तो नुकसानीचा ढिगारा! या घटनेत दुकानदार आणि दुचाकी मालकाला विनाकारण मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे. “मोकाट जनावरांच्या या प्रश्नावर पालिकेचे नियंत्रण कधी येणार?” असा संतप्त सवाल आता धनजीनाक्यातील नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.