चिपळूण उड्डाणपुलाचे काम पुन्हा रखडले
मे २०२६ ची मुदत पाळणे प्रशासनाला अशक्य?
चिपळूण: चिपळूण शहरातून जाणारा महामार्गावरील सर्वात लांब उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, गेली पाच वर्षे सुरू असलेले हे काम अजूनही अपूर्ण आहे. सःद्यस्थिती पाहता हा पूल मार्गी लागण्यासाठी आणखी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यातही चिपळूणवासीयांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि कोकणची ‘लाईफलाईन’ समजला जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा केली असली तरी, रत्नागिरी जिल्ह्यातील कामाची कासवगती पाहता ही घोषणादेखील केवळ ‘तारीख पे तारीख’ ठरण्याची चिन्हे आहेत.
चिपळूण शहरातून जाणारा महामार्गावरील सर्वात लांब उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, गेली पाच वर्षे सुरू असलेले हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. सद्य:स्थिती पाहता हा पूल मार्गी लागण्यासाठी आणखी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदाच्या पावसाळ्यातही चिपळूणवासीयांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
मंत्री महोदयांनी दिलेली ”मे २०२६” ही अंतिम मुदत गाठणे सद्य:स्थितीतील कामाची गती पाहता अशक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे कोकणी माणसाचा संयम आता सुटत चालला असून प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम पूर्ण देशातील इतर अनेक राष्ट्रीय महामार्गांची कामे विक्रमी वेळेत पूर्ण झाली असली तरी, मुंबई-गोवा महामार्गाचे नशीब मात्र १५ वर्षांनंतरही बदललेले नाही. शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भाग अपूर्ण आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सुरू झालेला हा प्रकल्प गेली १२ वर्षे भाजप सरकारच्या कार्यकाळातही रखडलेलाच आहे.
चिपळुणात गेल्या चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र, हे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. कोकणातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चिपळुणात वाहनांची रेलचेल कायमच सुरू असते. त्यातच आता उन्हाळी सुटीमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दररोज सतावू लागला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगार व यंत्रणा वाढण्याची गरज आहे. असे मत शौकत मुकादम यांनी व्यक्त केले.