‘क्रिप्टो करन्सी’मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने २६ लाखांची फसवणूक
गुहागर पोलिसांत गुन्हा दाखल
गुहागर:
फेसबुकवर झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन एका इंजिनिअरला तब्बल २६ लाख ७६ हजार ९४१ रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जयगड-तवसाळ पुलाच्या कामासाठी कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ इंजिनिअरची ‘क्रिप्टो करन्सी’मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक करण्यात आली आहे.
अशोका बिल्टकॉन लिमिटेड कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले बिनय कुमार सिन्हा (वय ४८) यांना काही दिवसांपूर्वी फेसबुकवर ‘आदिती शर्मा’ नावाच्या एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. फेसबुक मॅसेंजर आणि व्हॉट्सॲपवरून संवाद साधत असताना आदितीने सिन्हा यांचा विश्वास संपादन केला. तिने त्यांना ETH Ethereum Platform मध्ये USDT (क्रिप्टो करन्सी) द्वारे गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवले.
आदितीने सिन्हा यांना Cinchain Platform ची लिंक दिली आणि Binance App वर खाते उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचा साथीदार ब्रोकर अंकित शर्मा याची ओळख करून दिली. अंकितने स्वतःला सीनियर फॉरेन एक्सचेंज ट्रेडिंग कन्सल्टंट असल्याचे सांगून सिन्हा यांना मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. २६ मार्च ते १६ एप्रिल या दरम्यान
तब्बल २६,७६,९४१ रुपये एवढी रक्कम गुंतवण्यात आली होती.
गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर जेव्हा फिर्यादी सिन्हा यांनी आपली रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्यांनी वारंवार आदिती शर्मा आणि अंकित शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनीही कोणताही प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिन्हा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आरोपी आदिती शर्मा आणि अंकित शर्मा यांच्याविरुद्ध कलम भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८, ३१९ आणि माहिती तंत्रज्ञान ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.