रत्नागिरी-देवरुख राज्य महामार्गावर भीषण अपघात; हातखंबा येथील दोघांचा मृत्यू, एक गंभीर
रत्नागिरी: रत्नागिरी-देवरुख राज्य महामार्गावर रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघाताने जिल्हा हादरला आहे. पांगरी परिसरात मोटरसायकलचा ताबा सुटून ती रस्त्यालगतच्या कट्ट्याला जोरात धडकल्याने झालेल्या या दुर्घटनेत हातखंबा बौद्धवाडी येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे हातखंबा परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा बौद्धवाडी येथील सुमित विकास कांबळे (वय ३५), विकास काशीराम कांबळे (वय ३८) आणि विकास चंद्रकांत कांबळे (वय ३८) हे तिघेही रविवारी देवरुख येथे एका लग्नसमारंभासाठी गेले होते. दुपारी लग्नाचे कार्य आटोपून ते आपल्या मोटरसायकलने रत्नागिरीच्या दिशेने परतत होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी पांगरी परिसरातील वळणावर आली असता, चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि भरधाव वेगातील दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर जाऊन आदळली.
ही धडक इतकी भीषण होती की, सुमित कांबळे आणि विकास काशीराम कांबळे हे दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले. तर त्यांच्यासोबत असलेले विकास चंद्रकांत कांबळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्या अंगावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
तातडीने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिका चालक व मदतनीसांनी जखमींना तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सुमित आणि विकास काशीराम कांबळे यांना मृत घोषित केले. गंभीर जखमी विकास चंद्रकांत कांबळे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू असून, एकाच वाडीतील दोन तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे हातखंबा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लग्नाचा आनंद साजरा करून घरी परतत असतानाच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.