साखरपा–देवरुख मार्गावर ट्रकचा अपघात; चालक जखमी
संगमेश्वर: तालुक्यात साखरपा–देवरुख मार्गावर चौदा चाकी ट्रकचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना आज दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. कोंडगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत विठ्ठल शिंगटे (वय ४६) हे आपल्या ताब्यातील रिकामा ट्रक (क्र. यूपी ३५ एटी १२९२) घेऊन देवरुख मार्गे कोल्हापूरकडे जात होते. यावेळी चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला जाऊन धडकले. अपघात इतका भीषण होता की चालक ट्रकमध्येच अडकून पडला.
घटनेची माहिती मिळताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे तसेच पारस साखरे, अंकुश सुर्वे, साहिल चव्हाण, मुरलीधर पांचाळ या ग्रामस्थांच्या मदतीने आणि रवी इन्फ्रा कंपनीच्या हायड्रा मशीनच्या साहाय्याने जखमी चालकाची सुटका करण्यात आली.
जखमी हनुमंत शिंगटे यांना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.