दापोलीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक
रॉंग साईडने येणाऱ्या चालकामुळे अपघात
दापोली:
दापोली तालुक्यातील कडावळे ते दापोली रोडवर बोडीवली येथील साईबाबा मंदिराजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे. चुकीच्या बाजूने (रॉंग साईड) भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने समोरील स्कुटीला धडक दिल्याने दोन तरुणी जखमी झाल्या आहेत.
फिर्यादी सिद्धी सुधाकर कमळकर (वय २२, रा. कडावळे कळमकरवाडी) या आपली अॅक्टिव्हा स्कुटी (क्र. MH 08 Q 2059) घेऊन आपल्या बहिणीसह (श्वेताली कळमकर) २२ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास प्रवास करत होत्या. यावेळी बोडीवली साईबाबा मंदिराजवळील वळणावर आरोपी किरण मधुकर कोळंबेकर (वय ३५, रा. बोडीवली) याने आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने चालवत सिद्धी यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.
या अपघातात फिर्यादी सिद्धी कमळकर आणि श्वेताली कळमकर या दोघींनाही लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
याप्रकरणी सिद्धी कमळकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी किरण कोळंबेकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.