चिपळूण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
चिपळूण :
चिपळूण परिसरासह ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे आंबा पिकाचे व व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक विक्रेत्यांचा आंबा पूर्णतः भिजला आहे.
गुरुवारी (दि.23) दुपारपासून उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला होता तर मळभाचे वातावरण होते. दुपारी 3 नंतर अचानक पूर्वेच्या बाजूकडून काळे ढग जमू लागले आणि सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आकाशात काळे ढग जमल्याने काळोख दाटून आला. यानंतर 5 वाजण्याच्या सुमारास वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसाने मातीला सुगंध सुटला तर हवेतदेखील गारवा निर्माण झाला. मात्र, या पावसामुळे बाजारपेठेतील आंबा व्यापारी, विक्रेते यांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेक व्यावसायिकांचा आंबा भिजला. या शिवाय झाडावरील आंब्याला देखील अवकाळी पावसाचा फटका बसला असून व्यापार्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. या बरोबरच शहर परिसरातील कापसाळ, सावर्डे, शिरगाव, दसपटी विभाग, पोफळी आदी भागात देखील पाऊस झाला.