पटवर्धन हायस्कूलमध्ये पंचकोशाधारित शिक्षणसंजीवन गुरुकुल प्रकल्पातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य
रत्नागिरी, प्रतिनिधी :
भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे ‘गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुल’ प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार पंचकोशाधारित शिक्षण दिले जात असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली. सन 2004 पासून सुरू असलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत हजारहून अधिक विद्यार्थी घडले आहेत. संजीवन गुरुकुल प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि जीवनमूल्यांची जपणूक होत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
गुरुवर्य रामचंद्र जोग यांच्या संकल्पनेतून संजीवन गुरुकुल सुरू झाले. १२५ वर्षांच्या उंबरठ्यावर असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये २००४ पासून गुरुकुल उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
या छोटेखानी कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाहक धनेश रायकर, विश्वस्त चंद्रकांत घवाळी, मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, गुरुकुल विभाग प्रमुख मनाली नाईक, तसेच माजी गुरुकुल प्रमुख मनोज जाधव आणि गुरुकुलमधील दादा-ताई उपस्थित होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पंचकोश विकास संकल्पना महत्त्वाची मानली जाते. या संकल्पनेनुसार शिक्षण हे केवळ बौद्धिक न राहता शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांचा विकास घडवणारे असावे, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
संजीवन गुरुकुल ही ११ तासांची शाळा असून ती सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत चालते. सकाळच्या सत्रात प्रार्थना, उपासना, सूर्यनमस्कार आदी उपक्रम राबवले जातात. दुपारच्या सत्रात दैनंदिन अध्यापन व स्वयंअध्ययन, तर सायंकाळच्या सत्रात विविध कला, कौशल्ये आणि मैदानी खेळांचा समावेश असतो.
या गुरुकुलची वैशिष्ट्ये म्हणजे सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आणि पंचकोश विकासाचा अभिनव प्रयोग. विद्यार्थ्यांसाठी व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार, मैदानी खेळ, मल्लखांब, सायकल सहल, मातृभूमी परिचय शिबिर, भातलावणी व वर्षासहली असे विविध उपक्रम राबवले जातात.
तसेच सर्व जयंती व पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन, स्वयंअध्ययन कौशल्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण उज्ज्वल निकालाची परंपरा आणि उन्हाळी सुटीत छंदवर्ग यांनाही प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलता विकसित करण्यासाठी राखी, दिनदर्शिका, भाजी व उटणे यांसारखे विक्री उपक्रमही घेतले जातात. याशिवाय दरमहा शासकीय जलतरण तलावावर पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. संवाद कौशल्य वृद्धीसाठी व्यक्तिपरिचय व क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. मर्यादित विद्यार्थीसंख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन मार्गदर्शन केले जाते.