नामदार उदय सामंत यांच्या पुढाकारातून जागतिक दर्जाच्या तायक्वॉंदो सुविधा
रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे आणि खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे उद्योगमंत्री ना. श्री. उदय सामंत यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ आणि ‘जनरेशन-३ सेन्सर किट’ रत्नागिरीत उपलब्ध करून देण्यात आले असून, यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मोलाची भर पडली आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जागतिक स्तरावर चमकण्याची प्रचंड क्षमता आहे, परंतु योग्य सुविधा आणि साहित्याअभावी त्यांना अडचणी येत होत्या. ही उणीव ओळखून मंत्री उदय सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून आता रत्नागिरीतील खेळाडूंना जागतिक दर्जाचा सराव करण्याची संधी घरबसल्या मिळणार आहे.
या अत्याधुनिक मॅटचे उद्घाटन १८ एप्रिल रोजी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योगमंत्री ना. उदय सामंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, नगरसेवक सौरभ मलुष्टे, अमित विलणकर, बंड्याशेठ साळवी,जि. प. सदस्य प्रकाश रसाळ, बिपीन बंदरकर, तायक्वॉंदो प्रशिक्षक शाहरुख शेख, प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ‘एस आर के’ व ‘गणराज तायक्वॉंदो क्लब’चे पदाधिकारी, खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकाऱी डॉ. अविनाश बारगजे, मिलिंद पठारे, प्रवीण बोरसे, लक्ष्मण कररा, शशांक घडशी यांनी मंत्री महोदयांचे आभार मानले आहेत.