वीस फूट खोल विहिरीत पडला रानगवा
६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुटका
संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-हरेकर वाडी येथे म्हाताऱ्याचं कोंड या भागात विष्णू हरडे यांच्या २० फूट खोल विहिरीत पडलेल्या एका अवघ्या दीड वर्षांच्या निरागस रानगव्याला वाचवण्यासाठी वनविभागाने आपल्या प्राणांची बाजी लावली. सुमारे सहा तासांच्या अंगावर काटा आणणाऱ्या संघर्षानंतर या अबोल जिवाला अखेर जीवदान मिळाले.
२० एप्रिलची ती सकाळ इतर दिवसांसारखीच शांत होती, पण अचानक विष्णू हरडे यांच्या विहिरीतून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला आणि शांतता भंग पावली. ग्रामस्थांनी धाव घेऊन पाहिले तर काळजाचा ठोकाच चुकला! सुमारे १५ बाय २० फूट आकाराच्या आणि २० फूट खोल विहिरीच्या काळ्याशार पाण्यात एक दीड वर्षांचा रानगवा मृत्यूशी झुंज देत होता. त्या मुक्या जिवाच्या डोळ्यांत जगण्याची आर्त हाक होती, पण विहिरीच्या उंच भिंती त्याला बाहेर पडू देत नव्हत्या. पोलीस पाटील तुरळ यांनी तातडीने ही खबर वनविभागाला दिली.
माहिती मिळताच परिमंडळ वन अधिकारी श्री. सागर गोसावी आणि त्यांच्या टीमने आवश्यक साहित्यासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती अत्यंत बिकट होती; विहीर खोल होती आणि रानगवा बिथरलेला होता. अशा वेळी विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी श्री. प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली एक अत्यंत धाडसी आणि थरारक योजना आखण्यात आली. विहिरीच्या एका बाजूला जेसीबीच्या साहाय्याने खोदून ‘रॅम’ म्हणजेच एक चढणीची वाट तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले.
भर उन्हात जेसीबीचे पाते डोंगर पोखरत होते आणि वनविभागाचे कर्मचारी त्या रानगव्याला धीर देत तिथेच उभे होते. वनपाल सागर गोसावी यांच्यासोबत वनरक्षक सुरज तेली (आरवली), आकाश कडुकर (फुणगूस), श्रीमती सुप्रिया काळे (दाभोळे) आणि सहयोग कराडे (साखरपा) यांनी अक्षरशः घामाच्या धारा गाळल्या. प्रत्येक सेकंदाला रानगव्याची भीती वाढत होती, पण वनविभागाच्या या जिद्दी जवानांच्या डोळ्यात फक्त त्या मुक्या जिवाचे प्राण वाचवण्याचे ध्येय होते.
सकाळी ९:३० ला सुरू झालेला हा जीवघेणा संघर्ष दुपारी ३:३० वाजेपर्यंत सुरू होता. तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर ती वाट तयार झाली. त्या मुक्या जिवानेही आपल्या रक्षकांचा विश्वास ओळखला आणि मोठ्या जिद्दीने त्या तयार केलेल्या मार्गावरून विहिरीबाहेर पाऊल ठेवले. बाहेर येताच त्याने एकदा मागे वळून पाहिले आणि थेट जंगलाच्या दिशेने आपल्या नैसर्गिक अधिवासात झेप घेतली. तो सुखरूप बाहेर निघताच उपस्थित असलेल्या शेकडो ग्रामस्थांनी आणि वन कर्मचाऱ्यांनी आनंदाने सुटकेचा निःश्वास सोडला; अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.