नातूनगर येथे बोलेरोच्या धडकेत वृध्द गंभीर जखमी
खेड:
मुंबई-गोवा महामार्गावर मौजे नातू नगर गावठण येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका ६२ वर्षीय वृध्दाला भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात भरत रामचंद्र पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री ७:४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राकेश रामचंद्र सारंगकर (वय ३६) हे त्यांचे मित्र सौरभ बेलोसे आणि भरत पवार यांच्यासह नातू नगर गावठण येथे उभे होते. यावेळी भरत पवार हे महामार्गापलीकडे असलेल्या ‘आशीर्वाद किराणा स्टोअर्स’ येथून नारळ खरेदी करून परत येत होते.
गोवा-मुंबई मार्गिकेवरून रस्ता ओलांडत असताना, गोव्याकडून येणाऱ्या एका बोलेरो पिकअप (क्र. RJ 17 GA 9095) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत भरधाव आणि निष्काळजीपणे चालवून पवार यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात भरत रामचंद्र पवार (वय ६२, रा. नातू नगर मोरेवाडी, ता. खेड) यांच्या हाता-पायांना किरकोळ तर डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या प्रकरणी राकेश सारंगकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी बोलेरो चालक रविंद्र रामरुप यादव (वय ३५, मूळ रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात कलम २८१, १२५(अ), १२५(ब), कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.