गव्हेत घरफोडीप्रकरणी एकजण ताब्यात
दापोली: तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे झालेल्या तब्बल १३ लाख २० हजार रुपयांच्या घरफोडीप्रकरणी दापोली पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपी राजू शंकर चौगुले याला ताब्यात घेतले आहे.
गव्हे येथील अशोक पवार यांच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने अत्यंत चलाखीने घरफोडी केली होती. सिमेंटच्या दरवाजाला कोयता, पक्कड व चाकूच्या साहाय्याने भोक पाडून दरवाजा उघडण्यात आला आणि त्यानंतर घरात प्रवेश करून दागिने व रोख रक्कम असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता.
या गंभीर घटनेनंतर दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपास अधिक प्रभावी करण्यासाठी श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तसेच घटनास्थळावरील पुरावे बारकाईने तपासण्यात आले.
दरम्यान, प्राथमिक चौकशीत संशय व्यक्त झालेल्या राजू शंकर चौगुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू असून लवकरच या घरफोडीचा संपूर्ण उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.