‘रत्नसिंधू केसरी’ मारुती बिर्जेचा विलनकर जिममध्ये सत्कार
रत्नागिरी:
नुकत्याच पार पडलेल्या ‘रत्नसिंधू केसरी’ कुस्ती स्पर्धेचा विजेता मारुती बिर्जे याचा भाई विलनकर जिम, कुवारबावच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. जिल्हा स्तरावर मानाची गदा पटकावल्याबद्दल भाई विलनकर यांनी बिर्जे याचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना मारुती बिर्जे याने अत्यंत भावूक होऊन आपल्या यशाचे श्रेय भाई विलनकर यांच्या मार्गदर्शनाला दिले. तो म्हणाला, “भाई विलनकर यांनी आजवर जिल्ह्यात असंख्य कबड्डीपटू आणि कुस्तीगीर घडवले आहेत. मला देखील त्यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून, त्यांच्या प्रेरणेमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो.”
भाई विलनकर यांनी स्वतः कुस्तीमध्ये राज्य अजिंक्यपद पटकावले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात व्यायामाची आणि कुस्तीची एक मोठी फळी तयार झाली आहे. त्यांच्या जिमच्या माध्यमातून अनेक तरुण खेळाडू आजही जिल्ह्याचे नाव उंचावत आहेत.
या सत्कार समारंभाप्रसंगी जिममधील वरिष्ठ खेळाडू आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राकेश यादव,
विक्रम कदम, प्रशांत कोलगे, अनिल पाटील, समीर सुर्वे, प्रमोद देसाई, शाम गावकर यांच्यासह जिममधील बहुसंख्य विद्यार्थी आणि कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून मारुती बिर्जेचे कौतुक केले. या गौरव सोहळ्यामुळे रत्नागिरीतील कुस्ती क्षेत्राला नवचैतन्य मिळाले असून, आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंचा उत्साह दुणावला आहे.