आरोग्य सेवा सुदृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम
रत्नागिरी :
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्वाधिक रुग्ण तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आदर्श वैद्यकीय अधिकारी व आदर्श प्राथामिक आरोग्य केंद्र असा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा निर्णय जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आरोग्य समिती सभापती विलास चाळके यांनी दिली.
सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य समितीची बैठक जि.प. उपाध्यक्ष व आरोग्य समिती सभापती विलास चाळके याच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना चाळके यांनी सांगितले की, जि.प. शिक्षण विभागातर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. त्याचपध्दतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना चांगली सेवा देणे, सर्वाधिक रुग्णांची तपासणी करणे यासह रुग्णांसह ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य उत्तम रहावे म्हणून झटणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा जि.प. तर्फे आदर्श डॉक्टर पुरस्कार देऊन गौरव करण्याचा निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आदर्श काम करणाऱ्या आरोग्य केंद्राचा उत्कृष्ट आरोग्य केंद्र म्हणून पुरस्काराने गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्राच्या ओपीडीचा रिव्ह्यू दर महिन्याला घेतला जाणार आहे.
जिल्ह्यातील उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या काही इमारतींची कामे सुरु असून, त्यांच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. यावर चर्चाही करण्यात आली. ही कामे पावसाळ्यापूर्वी लवकर कशी पूर्ण होतील याकडे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यातील दिव्यांग रुग्णांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हेलपाटे मारावे लागतात, त्यासाठी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिरे आयोजित करण्यावर चर्चा करण्यात आली. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक जगताप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनीही यावर मार्गदर्शन केले. आरोग्याच्या निधीची कमतरता पडू नये यासाठी पालकमंत्री ना. सामंत यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष आणि आरोग्य समिती सदस्य विक्रांत जाधव, संतोष थेराडे, पुजाताई निकम व समितीचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.