जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमधून निवडणार दोन जिल्हाध्यक्ष
सचिव दानिश अब्रार; पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार कारवाई
रत्नागिरी ः
काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जिल्हाध्यक्ष नियुक्तीची पद्धत आता संपुष्टात आली आहे. पक्षनेते राहुल गांधी यांच्या आदेशानुसार पक्षात नेताच नसावा तर अडीअडचणीत दुःखात धावून येणारा कार्यकर्ता असला पाहिजे. त्यानुसार कार्यकर्त्यांमधूनच दोन जिल्हाध्यक्ष कार्यकर्त्यांमधुनच निवडले जाणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव दानिश अब्रार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव दानिश अब्रार यांनी जिल्हाध्यक्ष निवडीचा निकाल मे अखेरीपर्यंत निश्चित होईल, असेही सांगितले. 20 एप्रिल पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन पुढील महिना दीड महिन्यात जिल्हाध्यक्ष निवड जाहीर होईल. या पदांसाठी कोणताही कार्यकर्ता, नेता अर्ज भरु शकणार आहे.
कार्यकर्ता केवळ झेंडे लावणे, खुर्च्या, टेबल उचलणे, खटले अंगावर घेण्यासाठी नाही. आत्तापर्यंत थेट नियुक्ती झाल्या परंतू आता प्रत्यक्ष कार्यकर्त्यांमधून नेता निवडला जाणार असल्याचे अब्रार यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कीर, नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे, विद्यमान दोन्ही जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी उत्तर आणि दक्षिण जिल्हा असे दोन जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. 15 एप्रिल पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील नेते,कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हाध्यक्ष पदासाठी अर्ज भरून घेतले जाणार आहेत. जे अर्ज येतील आणि कार्यकर्त्यांशी चर्चा होऊन जी माहिती मिळेल ती पक्ष नेत्यांकडे सुपूर्त केली जाणार असल्याचेही सचिव अब्रार यांनी सांगितले.