डिजीटल युगातही ‘हस्तलिखित’ अंतरपाटांची क्रेझ
लग्नसराईत मराठी नावाला वधु-वरांच्या पसंती!
रत्नागिरी:
सध्या सर्वत्र लग्नसराईची लगबग सुरू आहे. काळानुसार लग्नातील रितीरिवाज आणि पद्धती बदलत असल्या तरी, काही पारंपरिक गोष्टींचे महत्त्व आजही अबाधित आहे. विशेष म्हणजे, आजच्या आधुनिक डिजिटल युगातही हाताने रंगवलेल्या मराठी अक्षरातील अंतरपाटांना मोठी मागणी वाढली असून, ग्रामीण भागासह शहरातही हा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे.
लग्नाच्या मुहूर्तावर मंगलाष्टके म्हणताना वधू-वरांच्या मध्ये धरला जाणारा अंतरपाट हा सोहळ्याचा केंद्रबिंदू असतो. पूर्वी साध्या कापडावर स्वस्तिक असलेले अंतरपाट वापरले जात. मात्र, आता त्यावर वधू-वरांची मराठीतील नावे, शुभ चिन्हे जसे की कलश, स्वस्तिक
आकर्षक फुलांची कलाकुसर आणि नक्षीकाम
यामुळे लग्नाचे पावित्र्य अधिकच खुलून दिसत आहे. रेडीमेड वस्तूंच्या गराड्यात हाताने रंगवलेले हे अंतरपाट आपले वेगळेपण जपून आहेत.
या ट्रेंडमुळे चित्रकला आणि पेंटिंग करणाऱ्या स्थानिक कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपली कला अजूनही जिवंत आहे आणि तिला सन्मान मिळतोय, ही भावना कलाकारांसाठी सुखावह आहे. केवळ लग्नासाठीच नाही, तर व्रतबंध (मुंज) सोहळ्यासाठीही अशा खास अंतरपाटांची मागणी होत आहे.
रुखवतातही नाविण्य
केवळ अंतरपाटच नव्हे, तर लग्नातील रुखवतातही आता रेडीमेड वस्तूंपेक्षा घरच्या घरी तयार केलेल्या नानाविध साहित्याला प्राधान्य दिले जात आहे. वधू-वरांच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण अधिक खास बनवण्यासाठी अशा कलात्मक वस्तू मोलाची भर घालत आहेत.
डिजिटल जमान्यातही गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही ऑर्डरप्रमाणे मराठी अक्षरातील अंतरपाट तयार करत आहोत. यामुळे केवळ परंपरा जपली जात नाही, तर आम्हा कलाकारांनाही कामाचा नवा हुरूप मिळत आहे अशी माहिती देवरुख येथील चित्रकार प्रवीण हर्डीकर यांनी दिली.