दापोलीत विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या
तोंडी परीक्षेच्या दिवशीच टोकाचे पाऊल
दापोली: दापोली तालुक्यातील मुगीज गोमलेवाडी येथे एका ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मोबाईलचे अतिप्रमाण आणि परीक्षेचे दडपण या कारणातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मृत आर्यन प्रकाश गोमले (वय १७ वर्षे ३ महिने) हा आपल्या कुटुंबासह मुगीज गोमलेवाडी येथे राहत होता. ९ एप्रिल रोजी आर्यनची तोंडी परीक्षा सुरू होणार होती. त्याची आई प्रतिभा गोमले या सकाळी नेहमीप्रमाणे कामावर निघून गेल्या होत्या. सकाळी ९:०० ते ११:३० च्या दरम्यान आर्यनने राहत्या घरातील बेडरूममधील लाकडी वाशाला नायलॉनच्या साडीने गळफास लावून घेतला. काही वेळाने ही घटना लक्षात येताच त्याला तातडीने खाली उतरवून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासाअंती दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
पोलिसांकडे दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्यनला मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरण्याची सवय होती. तसेच त्याच दिवसापासून त्याची तोंडी परीक्षा सुरू होणार असल्याने तो तणावाखाली होता का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. अवघ्या १७ व्या वर्षी आर्यनने आपले आयुष्य संपवल्यामुळे गोमलेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्र. ३७/२०२६) करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून विद्यार्थ्यांच्या वाढत्या मानसिक तणावाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.