सावर्डे येथे अर्टिगा कारला टेम्पोची धडक
मद्यधुंद चालकाच्या वेगामुळे अपघात, २ प्रवासी जखमी
चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे कोडमळा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका अर्टिगा कारला भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात घडवणारा टेम्पो चालक दारूच्या नशेत असल्याचे समोर आले असून, या धडकेत कारमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विद्या तेजस गायकवाड (वय २६, रा. चेंबूर, मुंबई) आणि त्यांचे पती तेजस गायकवाड हे आपल्या अर्टिगा कारने (MH 01 BY 0299) मुंबईच्या दिशेने जात होते. ३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास, लघुशंकेसाठी त्यांनी आपली कार सावर्डे कोडमळा येथे रस्त्याच्या कडेला पार्किंग लाईट सुरू करून उभी केली होती.
त्याच वेळी गोवा बाजूकडून येणारा टेम्पो (MH 07 AJ 6479) चालक सिद्धेश शिंगरे याने आपल्या ताब्यातील वाहन अत्यंत भरधाव वेगात आणि मद्यधुंद अवस्थेत चालवून उभ्या असलेल्या अर्टिगा कारला पाठीमागून भीषण धडक दिली.
या अपघातामध्ये अर्टिगा कारमधील दोन इसम जखमी झाले आहेत. अपघातामुळे कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रवाशांना किरकोळ व गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी ९ एप्रिल २०२६ रोजी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी टेम्पो चालक सिद्धेश शिंगरे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ व १८५ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ३३/२०२६ नुसार दाखल केला आहे.