अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचे अपहरण करत १.२५ लाखांच्या खंडणीची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी):
सावर्डे बाजारपेठ येथे झालेल्या एका अपघाताचा बदला घेण्यासाठी आणि गाडीच्या नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी एका २० वर्षीय तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी मुंबईतील चौघांविरुद्ध अपहरणासह खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश मारुती शिंगरे (वय २०) असे अपहरण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सावर्डे बाजारपेठ येथे सिद्धेशची गाडी आणि आरोपींच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात आरोपींच्या गाडीचे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत आरोपींनी सिद्धेशला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेले.
सिद्धेशला डांबून ठेवल्यानंतर आरोपींनी त्याच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केली. फिर्यादी मेघा मारुती शिंगरे (रा. कणकवली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आतापर्यंत टप्प्याटप्प्याने १८,००० आणि २५,००० अशी रोख रक्कम स्वीकारली आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता “आणखी १,२५,००० रुपये द्या, तरच मुलाला सोडू” अशी धमकी देत आरोपींनी सिद्धेशला अद्यापही बंदी करून ठेवले होते. या प्रकरणी तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, राजू गायकवाड, विनोद टक्के (सर्व राहणार मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर गुन्ह्या प्रकरणी फिर्यादी मेघा शिंगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०८ (२), १४२, १२६, १२७ (३), १४० आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ८ एप्रिल रोजी मध्यरात्री १:१५ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस सिद्धेशच्या सुटकेसाठी आणि आरोपींच्या अटकेसाठी वेगाने तपास करत आहेत.