आंबा घाटात दरोडा टाकणाऱ्या पाचजणांना दोन तासात बेड्या
तीनजण अद्याप फरार, अटक पाचही आरोपी रत्नागिरीतील
रत्नागिरी
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात चाकूचा धाक दाखवून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीवर देवरुख पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणातील अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी रत्नागिरीतील आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे आपल्या बोलेरो गाडीतून वेतोशी (रत्नागिरी) येथून म्हैस घेऊन शिराळ्याकडे जात होते. सायंकाळी ६:३० च्या सुमारास आंबा घाट, दख्खन येथे एका थार गाडीने आणि ‘भारत सरकार’ असा स्टिकर असलेल्या इनोव्हा गाडीने त्यांना अडवले. गाडीतून आलेल्या ८ अनोळखी व्यक्तींनी दळवी यांना मारहाण व शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवला.
आरोपींनी त्यांना जबरदस्तीने इनोव्हा गाडीत बसवून साखरपा येथील पेट्रोल पंपापर्यंत नेले. वाटेत त्यांना ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली आणि बोलेरोच्या कॅबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये हिसकावून घेतले. “पोलिसांत तक्रार केली तर याद राख,” अशी धमकी देऊन आरोपींनी त्यांना अर्ध्या वाटेत उतरवून पोबारा केला.
फिर्यादीने साखरपा पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिल्यानंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. देवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन तासांत खालील पाच आरोपींना अटक केली. यामध्ये फरहान रशिद मुल्ला (वय ४२, रा. कोकण नगर, रत्नागिरी). प्रथमेश सचिन भाटकर (वय २४, रा. गोळप, रत्नागिरी), सर्वेश सुभाष किर (वय २२, रा. सोमेश्वर किरबाग, रत्नागिरी), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (वय २६, रा. कुवारबांव, रत्नागिरी) आणि भुषण बिपेंद्र सावंत (वय २६, रा. मिऱ्या, रत्नागिरी) या पाचजणांचा समावेश आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे, उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, शांताराम पेंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार आणि रेश्मा चव्हाण यांनी केली आहे.
फरार असलेल्या उर्वरित तीन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, या घटनेमुळे आंबा घाट परिसरात खळबळ उडाली आहे.