सुशोभिकरणाच्या कामाची नगरसेवक राजीव कीर यांनी केली पाहणी
रत्नागिरी:
रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या साळवी स्टॉप ते मारुती मंदिर, नाचणे रोड ते मारुती मंदिर आणि मारुती मंदिर ते दांडा फिशरीज या ‘Y’ आकाराच्या मुख्य रस्त्याच्या सुशोभीकरणाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा प्रकल्प शहराच्या सौंदर्यीकरणाचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. या प्रकल्पांतर्गत मार्गाचे रुंदीकरण, सुशोभीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात येत असून, काम पूर्ण झाल्यानंतर व्यापारी, नागरिक आणि पर्यटकांना एक वेगळा आणि सुखद अनुभव मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण कामाची नुकतीच शिवसेना नगरसेवक राजीव कीर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाच्या दर्जाबाबत आणि प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली. हे काम युद्धापातळीवर पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस मेहनत घेत असून, नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. रत्नागिरीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासोबतच शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हा ‘Y’ आकाराचा रस्ता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या विकासकामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला नवी उभारी मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या विकासकामात सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेवक राजीव कीर यांनी केले असून, लवकरच रत्नागिरीकरांना या जागतिक दर्जाच्या रस्त्याची अनुभूती घेता येईल, असे त्यांनी नमूद केले.
