कौशल फाळके यांची काँग्रेसच्या ‘रोजगार व स्वयंरोजगार’ विभाग जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती
रत्नागिरी:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी काळातील आव्हाने आणि राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटनात्मक फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रक्रियेचा भाग म्हणून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी कौशल रोशन फाळके यांची ‘रोजगार व स्वयंरोजगार’ विभागाच्या जिल्हा प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ही अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
राज्यात सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या ‘रोजगार व स्वयंरोजगार’ विभागाला अधिक सक्रिय करण्याचा निर्णय घेतला आहे. नवनियुक्त जिल्हा प्रभारी कौशल फाळके यांच्यावर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्यांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणे. शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची माहिती तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवणे. तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहिती देणे या जबाबदाऱ्या असतील.
“पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला सार्थ ठरवत रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन,” अशी भावना कौशल फाळके यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केली.
या नियुक्तीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कौशल फाळके यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.