आगवे येथे दुचाकीची कारला धडक
दोन विद्यार्थी जखमी, दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडताना दुचाकीने कारला दिलेल्या जोराच्या धडकेत दोन तरुण जखमी झाले आहेत. चिपळूण तालुक्यातील आगवे येथील हॉटेल ओशियानो पॅसिफिक समोर ही घटना घडली. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी आदित्य नेमीनाथ सरडे (वय २०, रा. मांडकी पालवण, मूळ रा. सोलापूर) हा आपली आर.एक्स १०० (MH 12 A 3497) ही दुचाकी घेऊन मुंबई-गोवा हायवेवरून जात होता. आगवे येथील हॉटेल ओशियानो पॅसिफिककडे जाण्यासाठी तो हायवे क्रॉस करत होता.
हायवे ओलांडताना दुभाजकावर थांबून दोन्ही बाजूंच्या वाहनांचा अंदाज घेणे आवश्यक होते. मात्र, आरोपीने दुभाजकावर न थांबता आपली दुचाकी अचानक वेगाने महामार्गावर घातली. याच वेळी गोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अर्टीगा कारला (MH 46 CQ 0200) दुचाकीने जोरात धडक दिली. या भीषण धडकेत दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दुचाकीवरील आदित्य नेमीनाथ सरडे (वय २०, चालक), साईराज सूर्यकांत सावंत (वय २०, रा. दहिवड, जि. सातारा) हे दोन तरुण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमी तरुण मांडकी पालवण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी असून हॉस्टेलवर राहतात.
याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गगनेश चंद्रकांत पटेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आदित्य सरडे याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.