स्वच्छ बसस्थानक अभियानांतर्गत पाली स्थानकाचे चौथे सर्वेक्षण; सुविधांच्या उन्नतीवर भर
रत्नागिरी:कोकण विभागातील महत्त्वाचे व मध्यवर्ती मानले जाणारे पाली बसस्थानक हे स्वच्छता व सुविधा यांबाबत पुन्हा एकदा चर्चेत आले असून ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ अंतर्गत स्थानकाचे चौथ्या टप्प्यातील सर्वेक्षण व मूल्यांकन नुकतेच पार पडले.
मुंबई–गोवा व मिऱ्या–नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर स्थित असल्याने पाली बसस्थानक हे कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, तळकोकण तसेच मुंबई विभागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. काही महिन्यांपूर्वीच स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून प्रवाशांसाठी आधुनिक व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिल्या सर्वेक्षणात ‘ब’ वर्गात द्वितीय क्रमांक मिळाल्याची माहिती सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी दिली.
या सर्वेक्षणादरम्यान सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे, अधिकारी प्रवीण पाटील यांनी स्थानक परिसर, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह तसेच व्यावसायिक आस्थापनांची पाहणी केली. यावेळी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर याही उपस्थित होत्या.
स्थानिक पातळीवर अॅड. सागर पाखरे व मराठा मंदिर हायस्कूलचे पर्यवेक्षक मिलिंद पालकर यांनी सर्वेक्षणाच्या निकषांनुसार गुणात्मक मूल्यांकन करून अभिप्राय नोंदविला. यावेळी वाहतूक नियंत्रक सुनील माळी, श्री. कनावजे, निवृत्त एसटी कर्मचारी प्रदीप सावंत, कर्मचारी व प्रवासी मित्र उपस्थित होते.
राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून गतवर्षी स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच स्थानकाने पहिल्या टप्प्यातच उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना असून ‘पे अँड पार्किंग’, ‘सेल्फी पॉईंट’ तसेच परिसरात बगीचा विकसित करण्याचाही प्रस्ताव आहे. यामुळे पाली बसस्थानक आणखी सुटसुटीत, सुरक्षित व आकर्षक होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.