अखेर मुंबई – विजयदुर्ग बोट सेवा बंद
मुंबई :- रो-रो बोट सेवा हा प्रकल्प सर्वात चर्चेत आलेला होता. मात्र मंत्री नितेश राणे यांनी सुरु केलेली ही सेवा गुढीपाडव्याच्या दिवशीच बंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-विजयदुर्ग रो – रो बोट सेवा बंद होण्याचे कारण म्हणजे याचे तिकीट दर खुप जास्त असणे. जे सर्वसामान्य लोकांना परवडत नव्हते शिवाय या रो-रो सेवेच्या बोटीत मिळणारे खाद्यपदार्थही अत्यंत महाग त्यामुळे प्रवाशांना आर्थिक ताण सहन करावा लागला. या सर्व कारणांमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी वाढली.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी या सर्व प्रकरणावर टीका केली आहे. त्यात त्यांनी सांगितले की कोणताही प्रकल्प हा सुरु करताना त्याचे योग्य नियोजन तसेच अंमलबजावणी करणे महत्त्वाची असते. पण या बोट सेवेच्या बाबतीत हे सर्व दिसून आलेले नाही. उपरकर यांच्या मते ही सेवा १९ मार्चला बंद करण्यात आली. त्यातही प्रवासी जर मुंबईहून सुटल्यानंतर विजयदुर्ग पोहोचल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नव्हती. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.
शिवाय बोटीमध्ये मुलभूत सुविधा नसल्याच्याही तक्रारीही समोर आल्या. शौचालय किंवा विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा याही पुरेशा नव्हत्या. त्यामुळे पण प्रवाशांचा अनुभव हा समाधानकारक नव्हता. या सर्व कारणांमुळे रो-रो सेवेमध्ये प्रवाशांची संख्या खुपच कमी दिसून येत होती. एका दिवशी ५० पेक्षा जास्त प्रवासीही या सेवेचा वापर करत नव्हते असेही समोर आले आहे.
खरं पाहिले तर योग्य नियोजनाचा अभाव,अतिरिक्त खर्च आणि अपुरी सुविधा या सर्व कारणांमुळे ही सेवा काही दिवसांत बंद पडली. त्यामुळेच भविष्यात असे प्रकल्प सुरु करताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.