बांधकाम कामगारांच्या हलगर्जीपणामुळे छतावरील चिरे पडून वृद्धा ठार; लांजा येथील दुर्दैवी घटना
लांजा:
घर दुरुस्तीचे काम सुरू असताना छताच्या माळ्यावर ठेवलेले जड दगडी चिरे अचानक कोसळून अंगावर पडल्याने वनिता वसंत पांचाळ (६७, रा. आगरगाव) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना ३ एप्रिल रोजी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास घडली. बांधकाम कामगारांनी जुन्या माळ्यावर चिरे ठेवल्याने वजनामुळे हा माळा कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांचाळ यांचे आगरगाव येथील घर बरेच जुने असून त्याच्या दुरुस्तीचे काम काढण्यात आले होते. घरावरील छप्पर काढलेले होते, मात्र माळा तसाच होता. घराचे नवीन बांधकाम करण्यासाठी कामगारांनी माळ्यावर सुमारे ४२ दगडी चिरे आणून ठेवले होते. याच घरात कुटुंबीय राहत होते. शुक्रवारी दुपारी उकाडा होत असल्याने वनिता पांचाळ या घरात पंखा लावून झोपल्या होत्या, तर इतर कुटुंबीय घराबाहेर बसले होते.
जुन्या माळ्याच्या लाकडी फळ्या आणि आधार देणारे खांब आधीच कमकुवत झाले होते. त्यातच जड चिऱ्यांचे वजन पडल्याने आणि पंख्याच्या कंपनामुळे अचानक संपूर्ण माळा चिऱ्यांसह वनिता पांचाळ यांच्या अंगावर कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक आणि घरातील लोक धावत आले. ढिगाऱ्याखाली साडीचे टोक दिसल्यानंतर तात्काळ चिरे आणि लाकडी फळ्या बाजूला करण्यात आल्या. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने व हात मोडल्याने वनिता यांचा जागीच मृत्यू झाला होता.
त्यांना तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मृताचा मुलगा पुण्यात असल्याने त्यांचा मृतदेह ‘पाली’ येथील शवगृहात ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी मुलगा आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे आगरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.