सेवानिवृत्त सैनिक रोशन शेलार यांचाभाई विलनकर जिममध्ये भव्य सत्कार
रत्नागिरी:
भारतीय सैन्यात प्रदीर्घ काळ देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले हवालदार रोशन रमेश शेलार यांचा कुवारबाव येथील भाई विलनकर जिमच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सोहळा जिमच्या आवारात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते शेलार यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने भाई विलनकर, राजेश तोडणकर, जितेंद्र पटेल, राकेश यादव, प्रमोद देसाई आदी उपस्थित होते.
देशसेवेचे व्रत पूर्ण करून परतलेल्या जवानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी जिममधील विद्यार्थी आणि कुवारबाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “तरुणांनी देशसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
सत्कारमूर्ती रोशन शेलार यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना जिमचे आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले. परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक केले असून, या कार्यक्रमामुळे परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.