शिक्षणातून सामाजिक विषमता दूर करा; ‘गोगटे-जोगळेकर’च्या पदवीदान समारंभात डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांचे आवाहन
रत्नागिरी: “शिक्षणाने समाजात बदल घडवण्याची ताकद आहे. शिक्षणाकडे केवळ पदवी मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता, समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम म्हणून पहावे. नव्या तंत्रज्ञानाला धडाडीने सामोरे जाऊन युवकांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आपले कर्तृत्व सिद्ध करावे,” असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले.
स्थानिक गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ शनिवारी डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सहसचिव श्रीकांत दुदगीकर, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई आणि परीक्षा नियंत्रक डॉ. विवेक भिडे उपस्थित होते.
डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रासंगिकतेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “युवक ही देशाची खरी संपत्ती आहे. रोजगारासाठी केवळ पदवी पुरेशी नसून ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीवर स्वार होऊन प्रगती साधा.” विशेषतः कोकणातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत मोठ्या संख्येने यश मिळवावे, यासाठी महाविद्यालयाने पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी किमान ६० तासांचा विशेष कोर्स सुरू करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. विवेक भिडे यांनी परीक्षेचा आढावा सादर केला. मार्च-एप्रिल २०२५ च्या सत्रात विविध शाखांमधून यशस्वी झालेल्या एकूण ८१८ विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यापैकी २८ गुणवंत विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला दिला. त्या म्हणाल्या:
“विद्यार्थ्यांनी मातृ, पितृ आणि गुरु या तिन्हींप्रती सदैव कृतज्ञ राहावे. भविष्यात आर्थिक नियोजन सक्षमपणे करा आणि आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यात येणारे ‘होकार’ आणि ‘नकार’ दोन्ही पचवण्याची ताकद निर्माण करा आणि चांगुलपणाच्या चक्रात सामील व्हा.”
प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, कष्ट आणि चिकाटी हेच यशाचे गमक आहे. महाविद्यालयाने दिलेले संस्कार हीच तुमच्या आयुष्याची शिदोरी असून आपल्यातील क्षमता ओळखून विकास करा.
दोन प्राध्यापकांना पी.एचडी. प्रदान
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचा झालेला सन्मान. डॉ. स्वप्नील जोशी आणि डॉ. मंगेश भोसले यांना वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्रातील पी.एचडी. पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्था, महाविद्यालय, कुटुंब आणि मार्गदर्शिका डॉ. यास्मिन आवटे यांचे आभार मानले.
उपस्थिती आणि समारोप
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत आणि महाविद्यालय गीताने झाली. शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या सोहळ्याला उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये (कला), डॉ. सीमा कदम (वाणिज्य), विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले.
